मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा सुरू केल्या आहेत. आज दिनांक 12 मे रोजी ठाण्यात राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे.
ठाणे शहाराजवळ असलेल्या कळव्याला ही सभा पार पडणार आहे. ही सभा शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली आहे. या सभेनिमित्त मनसे आमदार राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतान प्रतिक्रिया दिली.
राजू पाटील म्हणाले की, “मराठी माणूस राज ठाकरेंना धनुष्यबाणाच्या मंचावर बघायला उत्सुक आहे. राज ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे प्रतिरूप आहेत.” पुढे बोलताना पाटील म्हणाले, “आमच्यासाठी राज ठाकरे यांची सभा पर्वणीच असते. पण आमच्यासारखेच असंख्य शिवसैनिक, मराठी माणूस राज ठाकरे यांना धनुष्यबाणाच्या मंचावरून पुन्हा भाषण देताना पाहण्यास उत्सुक आहेत.”
राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळे होत स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी कधीच शिवसेना पक्षासाठी प्रचार सभा घेतली नव्हती. मात्र महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांनी आता शिवसेनेच्या प्रचारांना सुद्धा सुरुवात केली आहे. आजचे त्यांचे भाषण हे प्रत्येक मराठी माणसासाठी एक पर्वणीच ठरणार आहे.