समस्या स्वीकारण्याची चूक आपण केली म्हणून मुंबई पुन्हा बुडाली

मुंबई महानगरात रविवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद

मुंबई आणि मुंबईचा पाऊस याबद्दल वेगळं काही सांगायला नको, कारण हे सर्वश्रुत आहेच. जो मुंबईत राहत नाही त्यालाही मुंबईच्या पावसाचा परिचय आहे. दर वर्षीच्या पावसाळ्यात मुंबई पूर्णतः विस्कळीत होणार हे ठरलेलंच आहे. मुंबई महानगरात रविवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. या बातम्या दर वर्षी ठरलेल्याच असतात. मुंबईत व्यवस्थित व्यवस्थापन आणि पावसाच्या अनुषंगाने केलेल्या सुविधांचा अभाव आहे.

गेल्या वर्षी सुद्धा अनेकांनी यावर टीका केली आहे, त्याच्या आधीच्या वर्षी सुद्धा याच विषयावरून टीका झालेली आहे, याही वर्षी टीका होत आहे. पण यावर तोडगा मात्र काही काढायचा नाही. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे आता विरोधक पावसामुळे मुंबईची होणारी कोंडी यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडतील, पण हे तेवढ्यापूर्तच. विरोधक तर नाव ठेवणारच पण याच सोबत सत्ताधारी सुद्धा मुंबईच्या पावसाला नाव ठेवतात, “मुंबईचा पाऊस म्हणजे बापरे बापरे बापरे..”, एवढं म्हणलं की झालं.

चूक कुठे होत आहे माहिती का, आपण सगळेच या समस्येला स्वीकारलं आहे. सामान्य नागरिक असो, सरकार असो किंवा विरोधक असो, आपण सगळ्यांनीच पावसामुळे होणाऱ्या अडचणी स्वीकारल्या आहेत आणि मुंबई कधी थांबत नाही, असं फुकटचा अभिमान बाळगत चिखला-पाण्यातून प्रवास करत कामावर निघतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारतो, तेव्हा त्यावर आपण काहीच करू शकत नाही कारण आपल्यात त्या गोष्टी विरोधात किंवा परिस्थितीच्या विरोधात लढण्याची ताकदच उरत नाही.

पावसाळ्यात मुंबई विस्कळीत होतेच, मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचतेच, मुंबईत पावसाळ्यात लोक वाहून जातातच, मुंबईत पावसाळ्यात अनेकांचे जीवही जातातच, मुंबईत पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होतेच.. या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या आहेत आणि निमूटपणे सहन करण्याची ताकद आपण आपल्यात तयार केली आहे. म्हणून यावर कितीही ठरवलं तरी तोडगा निघणार नाही, कारण आपण स्वीकारलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *