त्रिपुरामध्ये तब्बल 828 विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 828 विद्यार्थ्यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह चाचणी केली आहे आणि 47 जणांना महामारीमुळे दुःखदपणे आपला जीव गमवावा लागला आहे. त्रिपुरामधील 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये या रोगाचे संकट पसरले आहे. विद्यार्थ्यांमध्ये इंजेक्शनच्या ड्रग्सच्या सेवनाने एचआयव्हीचा जलद प्रसार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नशा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबमधील काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ज्यात काही महिला व पुरुष ड्रग्सच्या अतीसेवनाने जागचे हालूही शकत नव्हते. काहींना पुढे पाऊल टाकायचे होते, मात्र त्यांना पुढचं पाऊल टाकायचेही कळत नव्हते. अक्षरशः झोंबी झाल्यासारखे हे लोक दिसत होते. ड्रग्समुळे किती भयानक अवस्था होऊ शकते याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.
पुण्यातही अनेक मोठ्या बार्समध्ये सुद्धा ड्रग्सचे सेवन सर्रासपणे करणे सुरूच आहे. त्याचेही अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे यात तरुणींचाही समावेश आहे. ‘व्हाय शुड बॉइज हॅव ऑल द फन’, असे म्हणत मुली सुद्धा मुलांच्या खांद्याला खांदा लाऊन अधोगती करत आहेत. आजकालची जी लाइफ स्टाइल तयार झाली आहे, ही अत्यंत घातक आणि विचित्र आहे आणि ही अजिबात संस्कृतीला धरून नाही. स्वातंत्र्यच्या नावाखाली वाट्टेल तसे जगणे जर यांच्यासाठी स्वातंत्र्य असेल तर पालकांनी हे स्वातंत्र्य मुलांकडून काढून टाकलेले बरे.
स्वतःच्या हाताने स्वतःचे आयुष्य खराब तर करत आहेतच, पण त्याच सोबत इतर समाजालाही धोक्यात टाकले जात आहे. त्रिपुरामध्ये 828 विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थी नक्कीच नशा करत नसतील, मात्र संसर्ग पसरल्याने त्यांचेही जगणे कठीण होऊन बसले आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात की संपूर्ण जगाचे लक्ष भारतीय तरूणांवर आहे, तर दुसरीकडे भारतीय तरुण नशा करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
ड्रग्सच्या संदर्भात काठोरात कठोर कारवाई करायला हवी. ज्या हॉटेल्स किंवा बार किंवा पब्समध्ये हे धंदे चालत आहेत, अशा हॉटेल्सवर सुद्धा कारवाई करत हॉटेलचे लायसेंस रद्द करायला हवे. प्रत्येक मेडिकलचे ऑडिट करणे आवश्यक आहे. काही कठोर पाऊले उचलली जात नाहीत तोपर्यंत देशातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाणार आणि स्वतःच्या आयुषयासोबत देशाचेही भवितव्य धोक्यात आणणार.